Ad will apear here
Next
असं हे वैशिष्ट्यपूर्ण कोल्हापूर...
समकालीन प्रकाशनाचा ‘महाराष्ट्र दर्शन’ हा ग्रंथ महाराष्ट्राला लाभलेला समृद्ध वारसा आणि आजचं जगणं यांचं समग्र दर्शन घडवतो. राज्यातल्या जिल्ह्या-जिल्ह्यांतल्या अभ्यासक-लेखकांच्या सहभागातून हा ग्रंथ आकाराला आला आहे. त्या ग्रंथातल्या कोल्हापूरबद्दलच्या लेखाचा हा संपादित अंश...
..........
रांगडेपणाबरोबर अंगात गुरगुर आणि मस्ती असणारी, रंगेलपणा अन् शौकीनपणाबरोबर जिवाला जीव देणारी, कौतुकाबरोबरच पाय आडवा घालून पाडण्याची तयारी असलेली, लाल मातीशी घट्ट नातं असणारी आणि ‘चैनीत’, ‘निवांत’ असे शब्द खऱ्या अर्थाने जगणारी अघळपघळ मनाची माणसं म्हटलं, की ती कोल्हापूरचीच असणार. दुसरी कुठली?

नदी-तलावात मस्तीत डुंबावं, लाल मातीत कुस्ती करावी, स्टार्चचे पांढरे कपडे, लहरी फेटा आणि कर्रकर्र वाजणारी पायताणं घालून मिरवावं अशी इच्छा या कोल्हापुरातला प्रत्येक पुरुष बाळगतो. तसं पाहता, इथे स्त्रिया म्हणजे ‘बाईमाणसं’देखील मिरवण्यात मागे नाहीत. सधन घरातल्या स्त्रिया सोन्याने मढलेल्या असतात. जरीकाठी साडी आणि डोक्यावर पदर घेऊन, त्याचं एक टोक हातात धरून हाताची घडी अशा पद्धतीने वावरणाऱ्या. सामान्य कष्टकरी वर्गातल्या बायका नऊवारी लुगडं नेसणाऱ्या, डोक्यावर पदर घेऊन त्यावर वैरणीचा भारा किंवा दही-लोण्याच्या भांड्याने भरलेली बुट्टी घेऊन बाजारात जाणाऱ्या. अर्थात त्यांच्याही अंगावर सहज पाच-पंचवीस तोळ्यांचे दागिने चकाकताना दिसतील. कोल्हापुरी साज, चिताक, बोरमाळ, जोंधळी पोत, मंगळसूत्र, हातात बिल्वर, पाटल्या, बांगड्या, बोटात अंगठी, कानात बुगडी, कर्णफूल, कुड्या, वेल असे इथल्या दागिन्यांचे प्रकार आहेत. इथले पुरुषसुद्धा गळ्यात सोन्याची चेन, त्यात अडकवलेलं वाघनख, हातात सोन्याचं कडं, बोटांत अंगठ्या, मनगटात सोनेरी घड्याळ आणि डोळ्यांवर रेबॅनचा गॉगल असे सजून धजून असलेले दिसतील. इथला सामान्य कष्टकरीसुद्धा बऱ्यापैकी अंगभर कपडे घालून वावरताना दिसतो.

पश्चिमेकडचा अतिडोंगराळ भाग आणि सांगलीचा पूर्वेकडील अति दुष्काळी भाग सोडला, तर उर्वरित दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात समृद्धी नांदते. हळद, द्राक्ष, ऊस, भाजीपाला, भात अशा पिकांबरोबरच मुबलक पशुधन हे इथल्या समृद्धीचं गुपित आहे. कृष्णा-पंचगंगा नद्या म्हणजे या भागाच्या जीवनदायिनी! कोल्हापूर ही छत्रपती भोसले घराण्याची गादी. त्यामुळे जिल्ह्यावर राजघराण्याची छाप दिसते. रांगडेपणा आणि आपलेपणा साऱ्या जिल्ह्यात ठासून भरलेला आहे. ‘कोल्हापुरी’ म्हणून जी जी वैशिष्ट्यं आहेत, ती सारी या जिल्ह्याच्या प्रत्येक भागात आढळतात.

अस्सल कोल्हापुरी ईर्ष्या आणि उत्साह तर कोल्हापूरकरांच्या नसानसांत भिनलेला! घर बांधायचं असो किंवा लग्न-बारसं असो; ते दणकेबाज झालंच पाहिजे ही इथली मानसिकता. अशा कार्यक्रमात मानापमानाची नाटकं भलतीच रंगतात. शुभकार्याला बहिणीने घराला तोरणं आणून बांधायची अशी इथली रीत आहे. त्याबरोबर पाच-पन्नास मंडळींना पुरेल असा ‘गारवा’ आणायचा. ‘गारवा’ हे एक खास कोल्हापुरी अन् भन्नाट प्रकरण आहे. भाकरी, पाटवडी, अंबील, घुगऱ्या, दही-भात, शेंगदाण्याची चटणी, कांदा अशा नाना पदार्थांची रेलचेल असलेल्या दुरड्या म्हणजे गारवा. या दुरड्या भरून बहिणीने वाजत-गाजत तोरण घेऊन यायचं, भावाच्या घराचा उंबरा धुऊन ते चौकटीला बांधायचं आणि मग आप्तेष्टांनी यथेच्छ ताव मारायचा...

लग्न ही तर आठ-दहा दिवसांची बेजमी म्हणायला हरकत नाही. शेजारपाजरच्या बायका-मुलींना जात्यावर हळद दळायला सुरुवात केल्यापासून मुहूर्तमेढ, लग्नाचा चुडा, गुगुळ, हळदी, साखरपुडा, अक्षता, लग्न, वरात, गोंधळ, जागर ते हळद काढण्यापर्यंतचे सगळे विधी पार पाडायचं म्हटलं, तरी दहा-पंधरा दिवस वातावरण उत्साहाने भारलेलं राहतं. लग्न ठरलं की याद्या करण्यासाठी ज्येष्ठ मंडळी चर्चेला बसतात. देण्या-घेण्याचे मुद्दे सुरू झाले की मुख्य मुद्दा असतो नवरा-नवरीचे पोषाख. ‘मुलाचे कपडे मुलीकडच्यांनी काढावेत’ आणि ‘मुलीचे कपडे मुलाकडच्यांनी काढावेत’ असं ठरतं. मग बाजारपेठेत कपडे खरेदीला ही दोन्ही घरची मंडळी एकत्र येतात. परस्परांच्या आवडीने खरेदी होते. दुकानाबाहेर आमच्यासारखा ओळखीचा भेटला की विचारपूस होते. 

‘काय, हिकडं कुठं?’

‘आमच्या भाच्याचं लग्न ठरलंय, म्हणून कपडे काढायला आलोय.’

‘मग कुठे काढले कपडे?’

‘मुलीचे ‘चंद्ररूप वालावलकर’मध्ये आणि मुलाचे ‘रेमंड’मध्ये.’

‘मग?’

‘मग काय! दोघांचे कपडे काढून आम्ही सोळंकीत आइस्क्रीम खायला आलोय.’

‘कपडे काढणं’ म्हणजे ‘खरेदी करणं’ हा खास इथला अर्थ ज्यांना माहीत नाही, त्यांची बोटं ही चर्चा ऐकून नक्कीच तोंडात जातील; पण आपण काय बोलतो, त्याचा अर्थ काय होतो याच्या परिणामांची पर्वा या अघळपघळ लोकांमध्ये नसते.

‘चौकश्या’ करणं हा इथल्या रिकामटेकड्यांचा खास उद्योग. खरं तर याला ‘दुसऱ्याची मापं काढणं’ असा वाक्प्रचार अस्तित्वात आहे. अशा वाक्प्रचाराप्रमाणेच अनेक विशेषणं, क्रियापदं, अनेकवचनं यांच्याही खास शैली इथे रुजल्या आहेत. ‘पॅन्टी शिवायला टाकल्यात, त्या आणायला निघालोय’ असं वाक्य इथे सहज कानावर पडतं. ‘पॅन्ट’चं अनेकवचन आमच्याकडे ‘पॅन्ट्स’ असं न होता ‘पॅन्टी’ होतं. भाषेच्या अशा अनेक करामती इथे होतच असतात. ‘निघालो आहे’ असं म्हणण्याऐवजी जरा जोर देऊन ‘निघालोय’ असा शॉर्टकट आम्ही सर्व क्रियांसाठी वापरतो. उदा. खायलोय, करायलोय, जायलोय, बघायलोय, टाकायलोय, यायलोय वगैरे.

तसं पाहता कोल्हापुरी भाषेला एक वेगळाच बाज आहे. इथे शिवीचा आवर्जून वापर होतोच; पण कोल्हापुरी अस्सलपणा किंवा झणझणीतपणाबरोबर ‘शिव्यां’च्याही अनेक छटा इथे दिसतात. ‘ए रांडंच्या’ हे रागाच्या भरात जेवढं जोर घेऊन येतं, तेच ‘काय रांड्या, कुठं गेलतंस?’ ही अगदी जिवाभावाच्या मित्राच्या चौकशीची सुरुवात असू शकते. ‘ते रांडंचं...’ असं दोघांनी चर्चा करताना तिसऱ्याबद्दल बोललेलं असतं; पण त्यात पुढे कौतुक, चेष्टा, टवाळी, सहानुभूती, प्रेम, आदर यापैकी काहीही असू शकतं. म्हणजे ‘ते रांडंचं लई भारी पडलं बघ!’, ‘ते रांडंचं लई शिकलंय रे!’, ‘ते रांडंचं असंच राहिलं बघ!’ वगैरे. पण काही म्हणा, जिवाभावाच्या मित्रानं आपल्याला तशी हाक नाही मारली तर चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. शब्दाचा अर्थ शिवीजन्य असला, तरी तो इथे आप्तजनांसाठीच असतो. शिक्षक, मित्राचे वडील, समाजातील प्रतिष्ठित यापैकी कोणालाही हे बिरूद लावून बोलण्यास इथे मुभा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

पण याशिवाय इतर शिव्यांचा वापर केला गेला तर मात्र कोल्हापूरकरांचा इगो दुखावला जाऊ शकतो. तसं झालं तर ‘पायताण’ अथवा ‘तलवार’ असे दोन आणि फक्त दोनच पर्याय कोल्हापूरकरांना माहीत आहेत.

इथल्या इतर काही भाषिक वैशिष्ट्यांची ओळख नोंदवणंही आवश्यक आहे. उदाहरणार्थ, अनेक भाववाचक नामांचं आम्ही अनेकवचन करू शकतो. म्हणजे प्रेमं, भुका, चैन्या! ‘हं, तुमी करा प्रेमं आणि आमी बघत बसतो!’ असं किंवा ‘काय, चैन्या करायलंस!’ असं किंवा ‘चला, आमानी भुका लागल्यात!’ असं सर्रास म्हटलं जाऊ शकतं. तसंच ‘केस’चं ‘केसं’, ‘दगड’चं ‘दगडं’ वगैरेही इथे सर्रास होऊन जातं.

आणखी एक खासियत म्हणजे इकडचं व्याकरण जगावेगळं आहे. उदाहरणार्थ ‘तो’, ‘ती’, ‘ते’ हे अनुक्रमे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, आणि नपुसकलिंगासाठी वापरायचं, असं व्याकरणशास्त्र म्हणतं. पण ‘तो गेला’ असं म्हणण्याऐवजी ‘ते गेलं की’ असं म्हणत आम्ही व्याकरणाची खांडोळी करू शकतो. इथल्या स्त्रिया बोलताना ‘मी आले’ असं म्हणण्याऐवजी ‘मी आलो’, ‘मी गेलो’ वगैरे म्हणतात. असं का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर लक्षात येतं की हे मराठा राजधानीचं गाव आहे. ‘आम्ही आलो’, ‘आम्ही गेलो-चाललो’ असं बोलणं ही इथल्या राजघराण्यातील व्यक्तींच्या बोलण्याची पद्धत. हीच भाषा आता इथल्या माणसांच्या बोलण्यात, भाषेत, संवादात रुजली आहे.

इथल्या चौकातल्या मंडळाजवळ किंवा तालमीच्या दारात बसून सुरू असणारी वर्णनंसुद्धा एकदम झकास! ‘नाद करायचा नाही’, ‘नादखुळा रे...’ अशी खास कोल्हापुरी रचना अवधूत गुप्ते यांनी महाराष्ट्रभर नेली तेव्हा सर्वांना कळली. कोणी दुसऱ्याला एखादी गोष्ट अतिरंजित करून सांगत असेल किंवा मैत्रिणीला कडेला घेऊन सांगत असेल, तर जाता जाता ‘फशीव’, ‘गंडीव’ असा आवाज टाकून गेलं, की संबंधिताची भलतीच अडचण होऊन जाणार. 

फुटबॉल आणि हॉकी हे आमचे ‘गावखेळ’ आहेत. इथे मैदानात शिट्ट्यांबरोबरच शेलकी वाक्यं ही चिअरअपसाठी असतात आणि नंतर इतरांना त्यांच्या हायलाइट्स चौकात उभारून सांगताना ‘नादखुळा रे’, ‘एकदम गड्डा जाम’, ‘खटक्यावर ब्यॉट जाग्यावर पलटी’ हे मॅच, कुस्ती, अपघात, प्रेमप्रकरणं यापैकी कशासाठीही सोईने वापरायचं ‘विशेषण वाक्य’ असतं.

हां, आणखी एक आठवलं. इथल्या तरुण मंडळांची नावंसुद्धा भन्नाट आहेत. झाड ग्रुप, कलकल तरुण मंडळ, अचानक मित्र मंडळ, लेटेस्ट तरुण मंडळ, पॉवरफुल्ल चिक्कू मित्रमंडळ...! तरुण मुलं आपल्या मंडळांची नावं अशी का ठेवतात, यावर रिसर्च करणं आवश्यक आहे. रिक्षाच्या मागील बाजूस किंवा मडफ्लॅपवर लिहिलेला मजकूरसुद्धा असाच अभ्यास करण्यासारखा. ‘बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलाय वाघानं’, ‘तशी मी गावायची नाय,’ वगैरे... हे सुचतं कसं हे कोल्हापूरकरांनाच माहीत. या कल्पनाशक्तीतून इथे अशा अनेक ‘टर्मा’ तयार झाल्या आहेत. उदा. रंगाखुष, पाला झाला, हारकुन टुम्म! 

चेष्टा कुठे करावी यालाही इथे मर्यादा नाहीत. चेष्टामस्करीसाठी जो खुलेपणा असावा लागतो, तो इथे आहे. एखाद्या अंत्ययात्रेत प्रेताला खांदा देत चाललेला माणूस समोरून येणाऱ्याला विचारतो, ‘काय, बसणार काय डब्बलशीट?’ खऱ्या अर्थानं हे सारं अघळपघळ.

झलक कोल्हापूरची

- कानडी भाषेत ‘कोल्लं’ म्हणजे कमळं. कमळांचं गाव म्हणून त्याचं नाव कोल्लापूर. पूर्वी कोल्हापुरात चोवीस तळी होती आणि त्यात मुबलक कमळं फुलत, असं जुनी मंडळी सांगतात.

- कोल्हापूर म्हटलं की कुलस्वामिनी अंबाबाई, ज्योतिबा, नृसिंहवाडी ही धार्मिक श्रद्धास्थानं आठवतात, तसंच राजर्षी शाहू महाराज, त्यांनी सुरू केलेल्या संस्था- वास्तू, तसंच रंकाळाही डोळ्यांसमोर तरळतो. 

- झणझणीत मिसळ, कटवडा, जिलेबी, पांढरा-तांबडा मटण रस्सा, ‘इंपिरियल’ची थंडाई, सोळंकीचं आइस्क्रीम आणि गोटी सोड्याची फाउंटन्स ही इथली खास ओळख.

- इथे मटणाच्या तुकड्याला फोड म्हटलं जातं. पाणी ओतून मीठ-चटणी टाकून वाढवलेल्या रश्श्याला ‘खुळा रस्सा’ म्हटलं जातं. मटणाच्या रश्श्यासाठी जगावं असा इथला मूलमंत्र!

-  प्रचंड ऊस उत्पादन करणारे इथले शेतकरी, साखर कारखाने, गावोगावी पिवळा धम्मक गूळ बनवणारे छोटे कारखाने, सहकारी तत्त्वावर प्रचंड दूध उत्पादन करणारे ब्रँड्स अशा अनेक उद्योगांमुळे कोल्हापूर श्रीमंत बनलं आहे.

- स्वत:चं व्याकरणशास्त्र असलेली इथली बोली, कुस्ती आणि फुटबॉलवरचं प्रेम, शाही दसरा, कोल्हापुरी साज, कोल्हापुरी चपला आणि शास्त्रीय संगीताविषयीची ओढ ही कोल्हापूरची खास वैशिष्ट्यं. 

- उदय गायकवाड

(समकालीन प्रकाशनाचा ‘महाराष्ट्र दर्शन’ हा ग्रंथ ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZRBCH
Similar Posts
नर्मदातीरी मी सदा मस्त... ‘नर्मदातीरी मी सदा मस्त’ हे सदानंद येरवडेकर यांच्या लेखणीतून उतरलेले पुस्तक आहे. त्यातून नर्मदा परिक्रमेचा इतिवृत्तांत समोर येतो. ही परिक्रमेची दैनंदिनीच असल्याने परिक्रमा करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक आदर्श वस्तुपाठच आहे. परिक्रमेची पूर्वतयारी, काळजी, अनुभव, संकटे आणि समाधान अशी समग्र माहिती पुस्तकात आहे
प्रबळगड ट्रेक गेली १५हून अधिक वर्षे सह्याद्रीतील वाटांवर सातत्याने आणि सहज भटकंती करणारे सुशील दुधाणे यांचे ‘घाट वाटा’ हे पुस्तक एक सुगम वाटाड्या म्हणून ट्रेकर्सना उपयुक्त आहे. पुणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमधील आनंददायी सफरींचे वर्णन या पुस्तकात आले आहे. रायगड जिल्ह्यातील प्रबळगडाच्या भटकंतीबद्दल मार्गदर्शन
सैर ऐतिहासिक झाशीची... १८ जून हा झाशीची राणी लक्ष्मीबाईचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, ‘करू या देशाटन’ या सदरात माहिती घेऊ या झाशीची...
वास्तुसौंदर्याचा खजिना : ओरछा नगरी मध्य प्रदेशातील एकाहून एक सरस ठिकाणांची सैर आपण सध्या ‘करू या देशाटन’च्या माध्यमातून करत आहोत. गेल्या वेळी आपण ग्वाल्हेरमध्ये फेरफटका मारला. आजच्या भागात फिरू या ओरछा नगरीमध्ये.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language